मुंबई, १५ डिसेंबर २०२२ :महापुरुषांसंदर्भात सातत्याने होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात आज मुंबईतील वरळी परिसरात बंद पाळला जात आहे. हा एकदिवसीय बंद सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.
सकाळपासूनच वरळीत कडकडीत बंदला सुरुवात झाली असून, वरळीतील दुकाने बंद असून रस्तेही ओस पडले आहेत. त्याशिवाय कोणतीही अनुचित घटना घडू नये, बंदला हिंसक वळण लागू नये म्हणून वरळीत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- महाविकास आघाडीतर्फे १७ तारखेला आंदोलन
दरम्यान, या बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीकरांकडून बंदचे पोस्टर्सही सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तसेच वरळी परिसर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या बंद मध्ये आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे राज्यात त्याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळण्यात आले होते. तसेच राज्यपाल हटावची मागणीही करण्यात आली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.