नवी दिल्ली, दि. २२ जून २०२०: माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी सरकारला त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविषयी तसेच चुकीच्या धोरणांविषयी वारंवार सतर्क केले आहे. सरकारने घेतलेल्या सर्व मोठ्या निर्णयांमध्ये मनमोहन सिंग हे नेहमीच सल्ले देत आले आहेत त्याचबरोबर त्याबाबतच्या दुष्परिणामांविषयी ही ते सरकारला सांगत आले आहे.
सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमा विवाद चालू आहे. यादरम्यान चीनने केलेल्या हल्ल्यामध्ये २० भारतीय जवानांचा बळी गेला आहे. अशा वेळी राहुल गांधींसह मनमोहन सिंग यांनी देखील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेराव घातला आहे. मनमोहन सिंग यांनी अशी टीका केली की दिशाभूल करणारा प्रचार हा कुटनितिक आणि मजबूत नेतृत्त्वाचा पर्याय कधीच असू शकत नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी सतत पंतप्रधान मोदींना गलवान वादावरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते की आपले सैन्य कोणत्या भूमीमध्ये शहीद झालेले आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावे. आपली जमीन चीनच्या ताब्यात नाही या मोदींच्या विधानाला विरोध करत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेच्या वादामध्ये माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे देखील सहभागी झाले आहेत.
१५ जून रोजी गलवान खोऱ्यामध्ये चीनने केलेल्या विश्वासघाती हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत मनमोहनसिंग यांनी सरळ नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मनमोहनसिंग म्हणाले, आज आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहोत. आपल्या सरकारने घेतलेले निर्णय हे भावी पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. परंतु सरकारने हे निर्णय तितक्याच जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. मोदींनी देखील आपली ही जबाबदारी ओळखून वक्तव्य करायला हवे व निर्णय घ्यायला हवेत.
पंतप्रधान मोदींना त्यांचे कर्तव्य लक्षात आणून देताना मनमोहन सिंग यांनी त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मनमोहनसिंग म्हणाले की पंतप्रधानांनी त्यांच्या शब्दांद्वारे आणि घोषणेद्वारे देशाच्या सुरक्षा आणि मोक्याच्या आणि स्थलीय हितसंबंधांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल नेहमीच अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी