मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२२: माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राम येथे मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना देशासह राज्यातल्याही प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मी मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यादव यांच्याशी माझा अनेक वेळा संबंध आला. मी नेहमीच त्यांची मते ऐकण्यासाठी उत्सुक असायचो. राष्ट्रहितासाठी मुलायम सिंह यादव यांनी नेहमी संसदेत महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.’

शरद पवार यांची प्रतिक्रिया :

शरद पवार यांनी मुलायम सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले आहे की, लोहियांच्या विचारसरणीवर मुलायम सिंह यादव यांनी राजकीय वाटचाल केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणातही लक्ष दिले. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने वैयक्तिक नुकसानही झाले आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहिली

उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे. मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना, असं ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलायम सिंग यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रेमळ, दिलदार नेता आपल्यातून गेला याचे दु:ख : सुप्रिया सुळे

संसदेत ते सर्वांशी प्रेमाने वागायचे. शेती, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींवर मनसोक्त चर्चा करायचे. त्यांच्याही वाईट वागणारे त्यांना सोडून जाणारे समोर आले तरी ते त्यांच्याशी प्रेमाने वागायचे. कष्टातून मोठा झालेला प्रेमळ दिलदार नेता आपल्यातून गेला याचे दु:ख खूप मोठे आहे. ते कायमच प्रोत्साहन द्यायचे. मोठ्या विचारांचे आणि प्रेमळ असे नेताजी मनाने दिलदार होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा