लाहोर, १२ डिसेंबर २०२२ : इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. आज २२ वर्षांनंतर इंग्लंडला पाकिस्तानमध्ये कसोटी जिंकण्यात यश मिळाले; परंतु जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे पाकिस्तानचे स्वप्न अपुरे राहिले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात २-० या गुणांनी पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जावे लागले. इंग्लंडने रावळपिंडीमध्ये पहिला कसोटी सामना जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटीतही त्यांनी विजय मिळवला आहे.
आजच्या सामन्यात मार्क वुडने चार विकेट घेतल्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मारली. पाकिस्तानचा संघ ४२.४२% विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. तर पाकिस्तानबरोबरच इंग्लंडचा संघही ४४.४४% विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर पोचला आहे. आता प्रतीक्षा आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारतीय संघाच्या खेळाची. भारतीय संघ अंतिम फेरीत पोचू शकेल का, याची उत्सुकता चाहत्यांना असणारच.
भारताला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये २ सामने गमावले तरीही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून भारत बाद होईल. त्यामुळे भारतासाठी पुढचा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर ७५ टक्के विजयासह ऑस्ट्रेलियाने पहिला नंबर पटकावला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ६०% विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे ५३.३३% विजयाच्या टक्केवारीसह श्रीलंकेने तिसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ४ सामने अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे