नितीश कुमारांबरोबरील भेटीनंतर अखिलेश पोहोचले लालूप्रसादांच्या भेटीला ! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उत्तरप्रदेश २७ एप्रिल २०२३: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. यापूर्वी अखिलेश यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची भेट घेतली होती. यानंतर तात्काळ ते लालूप्रसाद यादव यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव हे लालूप्रसाद यादव यांना भेटण्यासाठी त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या घरी पोहचले. दोघांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखिलेश यांनी लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र राजकीय वर्तुळात ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी घेतली गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नितीश कुमार हे २५ एप्रिल रोजी लखनौमध्ये होते, जिथे त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. यावेळी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते. यापूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. आता अखिलेश यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या भेटीने भाजपविरोधात महाआघाडीची चर्चा तीव्र झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा