मुंबई, ५ जानेवारी २०२३ : इमारतींमधील लिफ्टचा दर्जा आणि तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक पटींनी वाढ होत असल्याने केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सर्व राज्यांना लिफ्ट कायदा तातडीने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने सांगितले, की देशातील फक्त ११ राज्ये लिफ्ट कायद्याचे पालन करीत आहेत. ज्याअंतर्गत विहित भारतीय मानकांचे पालन करण्यासाठी इमारतींमध्ये लिफ्ट स्थापित करणे वैधानिक आहे. इतर राज्यांत लिफ्टबाबत केलेल्या कायद्याची दखल घेतली जात नाही.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात तत्काळ कारवाई करून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय मानक ब्युरोने लिफ्टच्या गुणवत्तेबाबत अनेक मानके तयार केली आहेत, जी लिफ्ट कायद्यानुसार लागू करणे अनिवार्य आहे. यामध्ये लिफ्ट सुरक्षित करण्यासह इतर मानकांचे पालन करणे समाविष्ट आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विहित मानके आणि कायदे असूनही केवळ ११ प्रमुख राज्यांमध्ये त्याचे पालन केले जात आहे.
२० वर्षीय तरुणाला गमवावा लागल जीव
बुधवारी दुपारी मुंबईच्या उपनगरातील विक्रोळी येथील २५ मजली इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पूर्व मुंबई उपनगरातील स्टेशन रोडवर असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चारजण काचेच्या केबिन लिफ्टमधून प्रवास करीत असताना खाली पडल्यानंतर तळमजल्यावरील लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की चारपैकी तीन पुरुष स्वतःहून लिफ्टमधून बाहेर पडले. चौथ्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव उपकरणे वापरली. त्यांना घाटकोपर महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड