देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल

10

मुंबई, ७ एप्रिल २०२१: अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील या सध्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरेंद्र पवार यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यांनी जयश्री पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. विरेंद्र पवार हे मराठा क्रांती मोर्चाचे नेते आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीच्या टार्गेटचे आरोप झाल्यानंतर जयश्री पाटील यांनी याचिका दाखल करत या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान विरेंद्र पवार यांनी आपल्या तक्रारीत जयश्री पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. जयश्री पाटील सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याविषयी त्यांनी तक्रार केली आहे की, अनिल देशमुख १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी बोलत असताना जयश्री पाटील या नेहमीच मराठा समाजाचा उल्लेख करतात. तसेच मुद्दामहून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल तसेच अटक करण्याची मागणीसुद्धा पवार यांनी केली आहे.

यानंतर पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, पाटील यांनी माफी मागितली नाही, तर आगामी काळात मराठा समाज आणखी आक्रमक होईल. जयश्री पाटील यांच्या विषयी बोलायचे झाले तर जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे