मुंबई, २४ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणातून मिळालेला काही वेळ मनोरंजनसाठीही देतात. ते स्वतः व्यंगचित्रकार असल्यानं ते कलेचे चाहतेही आहेत. नुकताच त्यांनी एक मराठी चित्रपट पहिला आणि आपल्याला तो खुप आवडला असल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
राज ठाकरेंना आवडलेला तो मराठी चित्रपट कोणता?
नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर नुकताच एक मराठी चित्रपट आला. मुळात हा चित्रपट २०१८ मध्ये सिनेमागृहात आला होता आणि प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मात्र राज ठाकरेंनी तो चित्रपट त्यांच्या घरी नेटफ्लिक्सवर बघितला आणि ते या चित्रपटाचे फॅन झाले. त्या मराठी चित्रपटाचं नाव आहे – ”आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर.”
सिनेमाबद्दल राज ठाकरे म्हणाले कि, –
“आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा जरी २०१८ ला रिलीज झाला होता, तरी माझा पहायचा राहुन गेला होता. पण बाहेर प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे बाहेर पडणं शक्यच नाही, त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.“एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शन पण. भालजी पेंढारकर सोडले, तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा मला योग आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यामुळे प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओके, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय, कडक!सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. करोनोत्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे… आणि … नटांच्या, संहितेच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी या सिनेमाविषयी भावना व्यक्त करत मराठी चित्रपटसृष्टीला शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

