पुरंदर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आ. संजय जगताप यांची तातडीची बैठक

6

पुरंदर दि.७ जुलै २०२० : गेल्या काही दिवसांमध्ये पुरंदर मधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुरंदर मध्ये एकाच दिवशी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.एकुण कोरोना रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. पुरंदर मध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी तातडीची बैठक बोलावून पुरंदर मधील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

पुरंदर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आमदार संजय जगताप यांनी प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली होती. सदर बैठकीस पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल हेंद्रे, डॉ. प्रविण जगताप डॉ. सुमीत काकडे डॉ. किरण राऊत तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास मिलिंद टोणपे, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय सासवड येथे अधिक बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आमदार संजय जगताप यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता आपण आपली व आपल्या परिवाराची योग्य ती काळजी घ्यावी. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व सतर्क रहावे. कोणत्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप आल्यास त्वरित रुग्णालयाशी संपर्क साधावा व सहकार्य करावे.आम्ही प्रशासन सज्ज आहोत. आपण आपल्या परिसरातून लवकरच कोरोना हद्दपार करू. अशा प्रकारचा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे. आमदार संजय जगताप यांनी ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण पहाणी करून ग्रामीण रुग्णालयातील औषध व्यवस्था, डॉक्टर्स, परिचारिका यांची आस्थेने चौकशी केली व रुग्णांची अधिक काळजी घेण्याचे त्यांना आवाहन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:राहुल शिंदे 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा