नवी दिल्ली, २८ सप्टेंबर २०२०: केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी बिलाविरोधात देशात निदर्शनं अध्याप चालूच आहेत. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश यासारख्या भागात त्याचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. सोमवारी सकाळी दिल्लीचं हृदय म्हटलं जाणारं राजपथ या विधेयकाच्या निषेधार्थ संतापलेलं दिसलं. येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका ट्रॅक्टरला आग लावून शेतीच्या विधेयकांचा निषेध केला.
नवीन तयार झालेल्या या शेतकरी कायद्याला विरोध करणारे काही काँग्रेस कार्यकर्ते सोमवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन राजपथवर पोहोचले. इंडिया गेटजवळ कृषी विधेयकाचा निषेध करत त्यांनी ट्रॅक्टरला आग लावली. घटनास्थळी पोहोचताच वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ७.१५ च्या सुमारास १५-२० लोक इंडिया गेटजवळ आले आणि त्यांनी ट्रॅक्टरला आग लावली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं आणि आग विझवित तेथून ट्रॅक्टर काढला. आता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं या प्रकरणाचा तपास सुरू केलाय, जी लोकं ट्रॅक्टर जाळण्यामध्ये सहभागी होती त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील.
दरम्यान या तिन्ही शेतीविषयक विधेयकांना काल राष्ट्रपती राजनाथ गोविंद यांनी मान्यता दिलीय. म्हणजेच आता यांचं रूपांतर कायद्यामध्ये झाला आहे. तथापि, देशातील विविध भागात निदर्शनं केली जात आहेत. काँग्रेससह विरोधी बाकावर बसलेले अनेक पक्ष या कायद्याला विरोध करीत आहेत. विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन या विधेयकावर सही न करण्याचं आवाहन केलं, पण तसं झाले नाही.
कर्नाटकातही सोमवारी शेतकऱ्यांनी राज्य बंद पुकारला आहे, कृषी विधेयकाच्या निषेधार्थ मंडया बंद ठेवल्या आहेत. तसेच बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहनही दुकानदारांनी केलं आहे. त्याचबरोबर जे काही दुकानदार शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपली दुकाने बंद करीत आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं पुष्प गुच्छ दिले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे