अग्निपथ योजना: अग्निपथ योजना मागं घ्यावी, 4 राज्यांच्या सरकारांची पंतप्रधान मोदींकडं मागणी

नवी दिल्ली, 19 जून 2022: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत देशाच्या अनेक भागातून निदर्शने होत असल्याची चित्रं समोर येत आहेत. योजनेला विरोध करणारे लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांनीही या योजनेला विरोध केला आहे. त्यामुळे ही योजना मागं घ्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. राजस्थान, केरळ, तामिळनाडू, पंजाबसह इतर राज्यांचाही या क्रमात समावेश आहे.

केरळचे मुख्यमंत्री म्हणाले – तरुणांच्या भावनांच्या विरुद्ध योजना

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी अग्निपथ योजना मागं घ्यावी. ते म्हणाले की, अग्निपथ योजनेला होणारा चौफेर विरोध म्हणजे भारतातील तरुणांच्या भावना काय आहेत, हे स्पष्ट द्योतक आहे, ही योजना त्यांच्या भावनांच्या विरुद्ध आहे, सीएम विजयन म्हणाले की, देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींना विनंती आहे, योजना परत घ्या. तसेच, तरुणांच्या भीतीचं निराकरण करण्याचा विचार करा.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले – हे देशाच्या विरोधात

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक निवेदन जारी करून केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्याची विनंती केलीय. ते म्हणाले की, अनेक निवृत्त संरक्षण अधिकारी आणि संरक्षण तज्ञांनी या योजनेला विरोध केलाय. अशा परिस्थितीत सरकारने ही योजना मागं घ्यावी. ते राष्ट्राच्या विरोधात आहे.

राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाने या योजनेच्या विरोधात केला ठराव मंजूर

राजस्थानमध्ये शनिवारी मंत्रिमंडळाने नरेंद्र मोदी सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्यास सांगणारा ठराव मंजूर केला. वास्तविक, जयपूरमध्येही या योजनेविरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. दुसरीकडं, अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस रविवारी जयपूरमध्ये तिरंगा रॅली काढणार आहे. जयपूर येथील अमर जवान ज्योती येथून रॅलीला सुरुवात होईल. या रॅलीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले- सरकारने ही योजना मागं घ्यावी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, केंद्र सरकारने अग्निपथ योजना मागं घ्यावी. दोन वर्षांपासून शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊन अंतिम भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांना लेखी परीक्षेत बसून देशसेवा करण्याची संधी सरकारने द्यावी, असंही ते म्हणाले.

या सरकारांव्यतिरिक्त आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकार चालवत असलेले राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून अग्निपथ योजना मागं घेण्याची मागणी केलीय. त्याचवेळी बिहारमधील एनडीए आघाडीत सहभागी असलेले जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह यांनीही सांगितलं की, लोकांचा रोष भाजपवर आहे, प्रशासन आपले काम करत आहे. उपेंद्र कुशवाह म्हणाले की, अग्निपथ योजना तरुणांच्या हिताची नाही, तिचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा