मुंबई १६ जून २०२२: महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसेनेने त्यांच्यावर १५० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कीटकनाशक खरेदीसाठी काढलेल्या निविदेत हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अब्दुल सत्तार यांच्या साथीदाराने अकोल्यातील कृषी विभागावर टाकलेल्या छाप्याचा संदर्भ देत, ठाकरे गटाने हा आरोप केलाय.
हा घोटाळा केबी बायो ऑरगॅनिक प्रा.लि.आणि न्यूएज ऍग्रो इनोव्हेशन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला तसेच एकाच संचालकाच्या नवे असणाऱ्या दोन कंपन्यांनी, सेंद्रिय कीटकनाशकांच्या खरेदीसाठी दिलेल्या निविदेत हा घोटाळा झाल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. या दोन्ही संबंधित कंपन्यांचे संचालक एकच व्यक्ती असल्याचा आरोप होत आहे. ती व्यक्ती अब्दुल सत्तार यांच्या जवळची आहे. अटी व शर्तींचे उल्लंघन करून त्यांनी स्वत:च्या मर्जीतील कंपनीला निविदा दिली.
या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कृषी विभागातील मंत्री आणि अधिकारी दलालीचे काम करतात. महाराष्ट्रातील कृषी विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या कृषी विभागात आज फक्त भ्रष्टाचार आणि दलाली केली जातेय. दानवे म्हणाले की, हा बट्टल नावाचा बाहेरचा माणूस आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या आरोपांवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलय कि, १५० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप खोटा आहे. विभागाकडून आतापर्यंत एकही टेंडर दिलेले नाही, मग निविदा काढण्यात घोटाळा झाल्याची चर्चा कुठून आली? एकाही ठेकेदाराला निविदा देण्यात आली नाही. असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्टपणे सांगितले आणि सगळे आरोप फेटाळुन लावले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड