इंडिया’च्या बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे मुखपत्र सामना तून भाजपा वर हल्लाबोल

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ : लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आली आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधक विविध दावे-प्रतिदावे घोषणा करत आहेत तर निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांचा पेच असताना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जय्यत तयारीही सुरू झाली आहे. त्यातच मुंबईत इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर वातवरण निर्मितीला सुरूवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडलं आहे.

आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले आहे की, २०२४ असो की २०२३, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती आता बळी पडणार नाही.

ठाकरे गटाने म्हटले आहे की, भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून–चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे. मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्मदेव तरी सांगू शकेल काय? हा प्रश्नच आहे. हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा ‘अ-लोकतांत्रिक’ पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो.

लोकसभा निवडणुका पण वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे, असं ठाकरे गटाने सामनातून म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा