Ahilyabai Holkar Free Bus Travel Scheme for Girls: शिक्षणापासून कोणतीही विद्यार्थिनी वंचित राहू नये, तिला शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रवासाची अडचण येऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजना राज्यभरातील विद्यार्थिनींसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी नवीन दारं उघडली जात आहेत.
या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये शिक्षणाप्रती असलेली सकारात्मकता दिसून येते. तळेगाव एसटी आगाराच्या माहितीनुसार, ७ जुलैपर्यंत एकट्या तळेगाव आगारातून ८४१ विद्यार्थिनींना मोफत प्रवासाचे पास वितरित करण्यात आले आहेत. शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आगार प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया देखील सोपी आहे. पात्र विद्यार्थिनींची यादी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तयार करतात आणि ती एसटीच्या आगारप्रमुखांकडे पाठवतात. मोफत पास मिळवण्यासाठी विद्यार्थिनीचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा उल्लेख, शाळेतील रजिस्टर क्रमांक आणि मुख्याध्यापकांचे पत्र ही आवश्यक कागदपत्रे लागतात.
या योजनेमुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत असले तरी, एसटी बसेस वेळेवर येणे आवश्यक असल्याची मागणी पवना विद्यामंदिर, पवनानगर येथील मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे यांनी केली आहे, जेणेकरून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. एकंदरीत, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजना राज्यातील लाखो मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश घेऊन येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































