देशात १ ऑक्टोबर, २०२३ पासून प्रवासी वाहनांमध्ये एअरबॅग्ज बंधनकारक… केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घोषणा

नवी दिल्ली , ३० ऑक्टोबर २०२२ : देशामध्ये रस्त्यावरील अपघातांचे सत्र लक्षात घेऊन, चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग्ज बंधनकारक करणार. अशी घोषणा काही दिवसापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून करण्यात आली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याची घोषणाही गडकरी यांनी केली आहे. त्यानुसार पुढील वर्षी १ ऑक्टोबर २०२३ पासून देशभरात प्रवासी वाहनांमध्ये एअरबॅग्ज वापरणे बंधनकारक होणार आहे

याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, रस्त्यावरील गाड्यांची किंमत आणि प्रकार याचा विचार न करता त्यातून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांची सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. ऑटो उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पुढील वर्षी १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी गाड्यांमध्ये (एम-१ श्रेणी) किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री याचे कार अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूचा बारकाईने तपास केल्यानंतर काही बाबी समोर आल्या. त्यांच्या मर्सिडीज गाडीचा वेग १०० किमी प्रति तासापेक्षा जास्त होता. त्याचप्रमाणे त्यांच्या गाडीमध्ये चारमध्ये चार एअरबॅग्ज होत्या. या एअरबॅग्ज प्रामुख्याने चालक आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करु शकतात. परंतु पाठीमागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचे यामुळे संरक्षण होत नाही. मिस्त्री यांच्या निधनानंतर भारतातील कारमधील एअरबॅग्जचा मुद्दा ऐरणीवर आला

या घटनेनंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना एअरबॅग्जबाबत थेट प्रश्न उपस्थित केले. कार निर्मिती कंपन्या परदेशात विकल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी आणि भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी वेगवेगळे सुरक्षेचे नियम वापरतात. यामध्ये एकाच कंपनीच्या एकाच मॉडेलच्या कारमध्ये भारतात चार तर परदेशात सहा एअरबॅग्ज वापरत असल्याची बाब ही समोर आली आहे. त्यामुळे आता एअरबॅग्जचा मुद्दा कळीचा असून त्यावर लवकर अमंलबजावणी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा