पुणे, १४ एप्रिल २०२३: पुणे-दिल्ली दरम्यान उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानातून उतरताना पाय घसरून एअर एशिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे विमानतळावर आज ही घटना घडली आहे. विविन अँथनी डॉमेनिक (वय ३४, रा. लोहगाव) असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
पुणे विमानतळावर एअर एशिया या विमान कंपनीसाठी सुरक्षा एजंट म्हणून हा कर्मचारी काम करत होता. सकाळी विमानात प्रवासी चढल्यानंतर कर्मचारी विमानातून खाली उतरत होता. त्यावेळी त्याला पायऱ्या न सापडल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांला तातडीने सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विमानतळावर घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावरील अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीची वैद्यकीय सेवेची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर