महाराष्ट्राचा मराठमोळा आणि भारताचा माजी क्रिकेटर ज्याने आपल्या फलंदाजीने संपूर्ण जगभरातील चाहत्यांना प्रेरित केले आहे. त्याचा साधेपणा, शांत स्वभाव आणि इतरांचा आदर करणारी प्रतिमा हे संस्कारी गुण नेहमी त्याला वेगळा ठरवतात.एक सामान्य घरात वाढलेल्या अजिंक्य राहणेचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले आहेत. त्याच्या डोक्यात कधीही यशाची हवा गेलेली नाही.
एका मध्यम वर्गीय घरातील अजिंक्य राहणेला क्रिकेटमध्ये यशाचा पल्ला गाठण्यासाठी कठोर परिश्रमाचा सामना करावा लागला होता. त्याला घरच्या परिस्थितीची आणि आपण घेत असलेल्या प्रचंड परिश्रमाची जाण होती. आपल्या वडिलांच्या खिशात फक्त उदरनिर्वाह करेल एवढेच पैसे असायचे ही परिस्थिती त्याने जवळून पाहिल्याने त्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. अजिंक्य राहणेने इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या साधेपणाचे आणि साधे राहणीमानाचे कारण सांगितले आहे.
माध्यमांशी बोलत असताना अजिंक्यने सांगितले, “मी डोंबिवलीहून क्रिकेट खेळायला जायचो. माझ्या वाडीलांना ऑफिसला जायला लागायचे त्यामुळे मी वयाच्या ८ वर्षीच रेल्वे प्रवास करायला लागलो आणि हा रेल्वेचा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता ” तुला वेगळ्या PR ची गरज का नाही असे विचारण्यात आले असता त्याबद्दल त्याने वक्तव्य केले आहे. तो म्हणला की, “मी एका सामान्य घरातून पुढे आलो आहे. माझ्या वडिलांचा पगार उदरनिर्वाह करेल इतकाच होता. त्यामुळे अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी माझी आई बेबी सिटिंग करायची. त्या आठवणी मला आजसुद्धा आठवतात.” त्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही फेक प्रसिद्धीची गरज वाटत नाही. मी आता जिथे आहे त्याचे कारण फक्त क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट हाच माझा PR आहे.
खेळाडूंना क्रिकेटमध्ये अचानक पैसा आणि प्रसिद्धी मिळते त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मार्गावरून भटकतात हे मी जवळून पाहिले आहे. पण खेळाडूने कधीही आपली मागची परिस्थिती आणि आपण कुठून आलो आहोत हे विसरू नये असे अजिंक्य सांगतो. मला कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात ढवळाढवळ करावयाची नाही, पण एक लीडर म्हणून मला त्यांना काय सांगायचे असेल तर त्यांना मी हेच सांगेल. अजिंक्य आपले पैसे खूप कटकसरीने खर्च करतो त्याबद्दल त्याने सांगितले आहे. तो म्हणाला, मी पैसे खर्च करताना पहिल्यांदा माझ्या कुटुंबाच्या मूल्यांचा विचार करतो. त्याने असे म्हंटले नाही की पैसे खर्च करू नका, पण जिथे खरच गरज असेल तिथेच पैसे खर्च करा. पुढे तो म्हणाला की, माझ्या आयुष्यात मी खूप उशीराने गाडी घेतली. मी अनिल कुंबळे, नीलेश कुलकर्णी यांच्याकडून लिफ्ट मागायचो. कारण मला हुशारीने गुंतवणूक करायची होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर