बीड, १९ सप्टेंबर २०२३ : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गट कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे. दरम्यान, पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलय.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी, भाजपने ताबडतोब पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तसेच, भाजप आमचा मित्र पक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या बद्दल बोलताना आपली मर्यादा राखून बोललं पाहिजे. आमच्या नेत्याबद्दल जर अशी वक्तव्य केली तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तसेच भाजप पक्षश्रेष्ठींकडे देखील याचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून, गोपीचंद पडळकर यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यातील कार्यकर्त्यांनी देखील असेच रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील अजित पवारांचे समर्थक यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे आंदोलन केले. तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारले.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
धनगर आरक्षणाच्या मु्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. पत्रकारांनी त्यांना याविषयी तुम्ही अजित पवारांना का पत्र लिहिले नाही, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यानंतर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख लबाड लांडग्याची लेक म्हणून केला आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे