स्वबळावर महापालिका लढण्याची अजित पवारांची तयारी; नागरिकांशी संवाद वाढवला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “कोणत्याही निवडणुकीत आपण आपल्या पद्धतीने तयारी करायची असते. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि इतर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करीत आहेत. आम्हीदेखील तशी तयारी करीत आहोत; तसेच महायुती अधिक मजबूत कशी होईल, याबाबतदेखील आमचा दृष्टिकोन आहे.”

पवार म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहे आणि राष्ट्रवादीही तसेच तयारी करत आहेत. शनिवारी झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची मते जाणून घेतली, तर ‘परिवार मिलन’ कार्यक्रमाद्वारे रस्ते, पाणी, वीज, कचरा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा झाली. या वेळी काही नवीन विकासकामांवरही चर्चा करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रवादीमधून शिवसेनेत (उबाठा) गेलेले संजोग वाघेरे पुन्हा अजित पवार यांच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पवार म्हणाले की, “संजोग वाघेरे यांना शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते तिकडे गेले; पण त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांना माझी विचारधारा पटल्यामुळे त्या आमच्या पक्षात आहेत.”

याशिवाय, पवार यांनी पिंपरी येथील हाफकिन संस्थेला भेट दिली. संस्थेला आवश्यक सुविधा मिळत नसल्याची माहिती मिळाल्यामुळे ही भेट घेण्यात आली. संस्थेला १५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मुंबईत बैठक घेऊन आगामी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील