नववर्षात पुणेकरांना दिलासा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्च २०२६ मध्ये धावणार!

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम ९०% पूर्ण झाले असून, येत्या मार्च २०२६ मध्ये या मार्गावर मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संपूर्ण २३.३ किमीचा मार्ग एकाच टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हिंजवडीच्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दररोज लाखो कर्मचारी हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये ये-जा करतात. रस्त्यांची दुरवस्था आणि अतिक्रमणामुळे त्यांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यात त्यांचे २-३ तास वाया जातात. याच कारणामुळे, आयटी कर्मचाऱ्यांनी मेट्रोचा पहिला टप्पा हिंजवडी ते बालेवाडी फाटापर्यंत लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकते. मात्र, प्रशासनाने संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मेट्रोच्या एका फेरीत सुमारे १,००० प्रवासी प्रवास करू शकतील. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत प्रत्येक ३० मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध असेल. प्रवासी संख्येनुसार फेऱ्यांची वारंवारता वाढू शकते. या मार्गावर एकूण २३ स्थानके असतील, ज्यात हिंजवडी (माण), शिवाजी चौक, बालेवाडी स्टेडियम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आणि शिवाजीनगर (सिव्हिल कोर्ट) यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. त्यामुळे, एकदा ही मेट्रो सुरू झाली की पुणेकरांच्या प्रवासातील अनेक अडचणी कमी होतील, अशी आशा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे