राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरणे हलवून सोडली आहेत. नुकत्याच झालेल्या ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका उषा वाघेरे यांची भेट घेतल्यामुळे संभाव्य घरवापसीच्या चर्चेला उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांचा पाठिंबा मजबूत करण्यासाठी मोहिमेला वेग दिला आहे. अजित पवार स्वतः राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देत असून, या माध्यमातून गमावलेला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या या भेटीदरम्यान, पिंपरी परिसरातील विकासकामे, स्थानिक अडचणी आणि आगामी संधींवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरसेविका उषा संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक डब्बू असवानी आणि प्रभाकर वाघेरे उपस्थित होते.
गेल्या चार दशकांपासून संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. मात्र डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभूत केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह हाती घेणार का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































