मुंबई, ८ जुलै २०२३ : एनडीएची १८ जुलैला दिल्लीत बैठक होत असुन या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्ष निहाय मोर्चेबांधणी सगळ्यांनी सुरू केली आहे. अशातच विरोधी पक्षांची एकजुटी साठी धडपड सुरु असताना आता भाजपने तयारी सुरू केली असुन एनडीएची बैठक त्या रणनीतीचाच एक भाग आहे.
राष्ट्रवादीची आणि या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या एनडीएच्या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात एंट्री होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवारांनी दिल्लीच्या राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलय. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर, अजित पवार एनडीएच्या बैठकीतून दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची वलय निर्माण करतात का? हे पाहणं येत्या काळात महाराष्ट्रीयांना उत्सुकतेच ठरेल.
एनडीएच्या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष उपस्थित राहतील तसेच गेल्या काही दिवसात भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू सुद्धा पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. तर लवकरच देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाही जाहीर होतील त्यामुळेे कर्नाटक चा पराभव पाहता, भाजपकडून आता व्यवस्थित तयारी करण्यात येतेय. मध्य प्रदेशात भाजप, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि तेलंगणात सध्या बी.आर.एस. सत्तेत आहे. महाराष्ट्रात चालणारी अजितदादांची कार्यक्षम दादागिरी आता दिल्लीत चालणार का, हे येणारा काळच ठरवेल.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे