बारामती, २२ ऑक्टोंबर २०२२: एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसेच्या वतीने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिवाळीनिमित्त पवार कुटुंब बारामतीत आहे. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. की, दिवाळीचा सण आहे, कोरोनानंतर दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यात चुकीचं काय? राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील तर त्याच्यात चुकीचं काय आहे? त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे? असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, दिवाळीचा शिधा १०० रुपयांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारला अपयश आल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करायला लागतं. नियोजनशून्य कारभार केला, तर अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचला आहे. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. १०० रुपयांमधला शिधा कुणी २०० किंवा ३०० रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.
भाजपा, शिंदे गट आणि मनसे यांची महायुती होणार का? अशी चर्चा सुरू असताना या तिन्ही पक्षांची नेतेमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी करत आहेत. त्यामुळे लवकरच युतीची घोषणा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तिन्ही पक्षांकडून याबाबत जाहीर टिप्पणी करणं टाळलं जात असलं, तरी युतीबाबत वरीष्ठ निर्णय घेतील, असं उत्तर येत आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविरामही देण्यात आलेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे