पुणे, ११ एप्रिल २०२१: राज्यात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसलेल्या शहरांपैकी पुणे एक आहे. एकीकडे राज्य सरकारने कोरोना विषयक नियमावली राज्यात जाहीर केली आहे तर पुण्यातील स्थिती पाहता महानगर प्रशासनाने पुण्यासाठी वेगळी कोरोना विषयक नियमावली जाहीर केली आहे. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात कडक निर्बंध लावण्यात आले. आहेत. अशातच काल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत’ आढावा बैठक पुणे येथे घेण्यात आली. यावेळी आरोग्य सुविधा वाढवण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं.
केंद्रातील संबंधित अधिकारी आणि मंत्रालयांशी चर्चा झाली असून येत्या ३-४ दिवसात शेजारील गुजरात आणि आंध्र प्रदेश मधून महाराष्ट्राला ११२१ वेंटीलेटर प्राप्त होतील. औद्योगिक आस्थापनांमधून ऑक्सिजन पुरवठयासाठी केंद्र राज्याला सहकार्य करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकानं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे. ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसंच रेमडेसिवीरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नाला सर्वांचे पाठबळ महत्त्वाचे आहे.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार आणि सुविधांमध्ये सातत्यानं वाढ करत रहा. त्याचप्रमाणे महानगरासह ग्रामीण भागातही ऑक्सिजनयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या, अशा सूचना बैठकीत केल्या गेल्या. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ज्या उपाययोजना सांगत आहे; त्याचे पालन करा. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कार्यवाही करावी. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आरोग्य सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देश यंत्रणेला यावेळी देण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे