अक्षर पटेल-सूर्यकुमार यादवची झुंजार खेळी व्यर्थ; श्रीलंकेची भारतावर १६ धावांनी मात

मालिकेत १-१ अशी बरोबरी; तिसरा अन् शेवटचा निर्णायक सामना उद्या राजकोटमध्ये होणार

पुणे, ६ जानेवारी २०२३ : भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ १९० धावाच करता आल्या.

हा सामना गुरुवारी (ता. पाच) पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर स्टेडियममध्ये खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा १६ धावांनी पराभव केला. उभय संघांतील पहिला ट्वेंटी-२० सामना भारताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने जिंकला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मालिकेतील हा दुसरा सामना जिंकून भारताकडे मालिका नावावर करण्याची संधी होती; पण या महत्त्वाच्या सामन्यात अर्शदीप सिंग एका षटकात तीन नो-बॉल टाकण्याची चूक करून बसला.

श्रीलंकेने ठेवलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये भारताने खराब फलंदाजी केली. सलामीवीर इशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिपक हुड्डा यांना दोन आकडी धावसंख्याही करता आली नाही. त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही; मात्र त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवला साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली; पण सूर्यकुमार यादव ५१ धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने शिवम मावीच्या साथीने लक्ष्याच्या जवळ पोचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ३१ चेंडूंत ६५ धावा करून बाद झाला आणि भारताच्या उरल्यासुरल्या अशा संपुष्टात आल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार सुरवात केली. यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गडगडला; पण शेवटी कर्णधार दासुन शनाकाने आक्रमक फलंदाजी करीत संघाची धावसंख्या २०६ धावांपर्यंत नेली. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दासुन शनाका यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुशल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी केली. खास करून मेंडीसने आक्रमक रूप दाखवीत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घेतला. या दोघांनी ८.२ षटकांत ८० धावांची सलामी दिली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात विकेट्स घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले होते; मात्र शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी मिळून तब्बल ७ नो-बॉल टाकले. त्यामुळे श्रीलंकेला खुले मैदान फटके मारण्यासाठी मिळाले. भारताकडून सर्वाधिक विकेट्स उमरान मलिकने घेतल्या. तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने मिळून ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली. उमरान मलिक याला एकाच षटकात तीन षटकार शनाकाने लगावले. त्यानंतर शिवम मावी व अर्शदीप सिंग यांचाही त्याने खरपूस समाचार घेतला.

शनाकाने अखेरपर्यंत नाबाद राहत २२ चेंडूंवर ५६ धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार व सहा उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ २० चेंडू घेतले. भारताविरुद्ध २५० च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज बनला. यापूर्वी श्रीलंकेकडून सर्वांत वेगवान ट्वेंटी-२० अर्धशतकाचा विक्रम माहेला जयवर्धने व कुमार संगकारा यांच्या नावे संयुक्तरीत्या होता. दोघांनीही २१ चेंडूंमध्ये अर्धशतके पूर्ण केलेली. तर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी २२ चेंडूंवर अर्धशतक पूर्ण करणारा कुसल परेरा आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा