अलंग, मदन, कुलंगचा थरारक प्रवास १२ तासात पूर्ण

पुणे: SL Adventure कडून आयोजित करण्यात आलेल्या अलंग मदन कुलंग ट्रेकला खरी सुरुवात झाली ती, शुक्रवारी (दि.२०) ला रात्री १०:३० वाजता. वाटेत सगळ्यांना घेत आम्ही सगळे १० जण साम्रद या गावी शनिवारी (दि.२१) ला सकाळी पहाटे ५:४५ ला पोहोचलो. त्यानंतर थोडा आराम करून सकाळी ७ वाजता महाराष्ट्रा मधल्या सगळ्यात अवघड ट्रेककडे कूच केली.
सगळेजण मज्जा मस्ती करत, सेल्फी घेत मार्गक्रमण करत होते. पहिल्यांदा थोडा सोप्पा वाटणारा ट्रेक नंतर जेव्हा अलंगच्या डाव्या बाजूला असणाऱ्या पठारावर येऊन पोहोचतो. तेव्हाच तिन्ही किल्यांचं दर्शन झाल्यावर कळत की हा काही साधा सुधा ट्रेक नाही. तरी देखील आम्ही चढाई चालू ठेवली. काही कारणास्तव ट्रेकला न आलेले आमचे मार्गदर्शक, SL चे संस्थापक लहू उघडे यांचा फोन आला. त्यांनी चौकशी केली आणि आमचा चालण्याचा वेग बघून ते म्हणाले की, तुम्ही हा ट्रेक एका दिवसात पूर्ण करू शकता. तसही आम्ही दोन दिवसांच्या प्लॅननी आलो होतो की एका दिवशी अलंग आणि मदन करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कुलंगला जायचं. परंतु लहू सरांच्या शब्दांनी ग्रुपला नवीन ऊर्जाच मिळाली. सगळ्यांनी ठरवलं की आपण हा ट्रेक एका दिवसात पूर्ण करायचा.
पण हे खरंच सोप्प नव्हतं. कारण त्यात भरपूर अडचणी होत्या जस की मोठे मोठे दगड,पाठीवर ओझे,सोसाट्याचा वारा,भरपूर ऊन, निमुळत्या वाटा,मधमाश्यांचा त्रास,पाण्याची कमी,अवघड चढाई. पण ह्या सर्वांवर मात करत आम्ही अलंग वर पोहोचलो. तिथून मग खरी परीक्षा सुरू झाली कारण अलंग उतरून रॅपलिंग करून आम्हाला मदन कडे जायचं होतं. वाट बिकट होती पण इथे २ व्यक्तींनी खूप मदत केली ते म्हणजे ट्रेक चे सर्व सूत्र हातात घेतलेले SL चे वजीरवीर कृष्णा मरगळे आणि रोहित आंदोडगी यांनी.
दुपारी १२:३० वाजता आम्ही सगळे सुखरूप अलंग आणि मदन च्या खिंडीत येऊन पोहोचलो. तिथे आमच्या जेवणाची सोय आमच्यासोबत आलेल्या साम्रद या गावातील युवराज बांडे, हरी मामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती.
जेवणावर मस्त ताव मारून आम्ही दुपारी १:३० ला मदन कडे न जाता कुलंगच्या दिशेने कूच केली. पण हा प्रवास काही सोप्पा नव्हता. वाटेत येणारी काटेरी झुडपे, निसरड्या वाटा पूर्ण करत आम्ही कुलंगच्या पायथ्याला पोहोचलो. आणि इथून खरी गंमत सुरू झाली. कारण कुलंगला भल्या मोठ्या पायऱ्या आपल्या स्वागत करतात. चढताना प्रत्येक जणांचे पाय लटलट कापत होते. तरीपण सगळ्यांनी हळू हळू कुलंग चा माथा गाठला. तिथे नैसर्गिक टाक्यांमधील पाणी पिऊन सगळ्यांनी कुलंग उतरायला अंदाजे ३:३० च्या सुमारास सुरुवात केली. उतरताना अक्षरशः सगळ्यांच्या पायातला जीवच निघून गेलाय की काय असच वाटत होतं.
आम्ही सगळे कुलंग उतरून सुमारे ५ वाजता मदनच्या खिंडीत येऊन पोहोचलो.तिथून मग सगळे जण मदन कडे रवाना झाले. पण बरेच जण बोलायला लागले की आज नको उद्या करू. पण सगळ्यांची जिद्द कायम होती.मदन चढताना सरळसोट अशी अंदाजे ५० फूट क्लाइबिंग आणि रॅपलिंग दोन्ही करावे लागते. त्यात पूर्ण कस लागतो. कारण वर पूर्ण डोंगर आणि खाली दरी. समिट केल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. सगळं पूर्ण करून आम्ही सगळे संध्याकाळी सुमारे ६:४५ च्या सुमारास मदन च्या खिंडीत येऊन पोहोचलो. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी महाराष्ट्रातला सर्वात अवघड ट्रेक १२ तासात पूर्ण करून साम्रद या गावी पोहोचलो.
या मोहिमेत मोलाची साथ लाभली ती म्हणजे वजीरवीर कृष्णा मरगळे आणि रोहित आंदोडगीयांची. त्यात सहभागी प्रथमेश सावंत(सातारा), शुभम झाडगे(सातारा), अस्लम मुजावर(पुणे), स्वप्नील देशमुख(पुणे), अभिजित मराठे(पुणे), नकुल सिंह(पुणे), विकी वनशिव(पुणे)
दीपक काकडे(पुणे).यांनी सहभाग नोंदवला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा