बीडमध्ये चक्क केली जातेय रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक

13

बीड, दि.२१मे २०२० : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यात अवैध दारू विक्रेत्यांचा मात्र सुळसुळाट असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दारू विक्रीसाठी नवीन नवीन शक्कल लढवताना हे विक्रेते पहायला मिळत आहेत. कधी पाण्याच्या जारमधून काही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दारूची वाहतूक केली जात आहे.आता मात्र ज्यातून अत्यावश्यक सेवा केली जाते, त्यातूनच म्हणजे रुग्णवाहिकेतूनच दारूची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक नगर रोडवर गस्त घालत असताना त्यांना म्हसोबा फाटा परिसरामध्ये बुधवारी ( दि.२०) सायंकाळी एका रुग्णवाहिकामध्ये विदेशी दारु आढळून आली. त्यातून जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या रुग्णवाहिकेमध्ये १८० मिली क्षमतेच्या मॅकडॉनल्ड नंबर वन व्हिस्की विदेशी दारूच्या ९६ बाटल्या दोन खोक्यांमध्ये ठेवलेल्या आढळून आल्या. वाहन चालक विशाल गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

१४ हजार ४०० रुपयाच्या विदेशी दारूसह मारुती ओम्नी कार असा एकूण एक लाख १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बीड समाधान शेळके, जवान अमिन सय्यद, सचिन सांगुळे व वाहन चालक सुंदर्डे यांनी केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: