मुंबई, 26 नोव्हेंबर 2021: गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. म्हणजेच 1 ली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen)करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलाय. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांचे दुमत होते. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
“ग्रामीण भागात 5वी ते 12वी तर शहरी भागात 8वी ते 12वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवी या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी लागणारी तयारी या काळात आम्हाला करता येईल. यापुढे महाराष्ट्रात पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील. अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे. दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे