सलून, ब्यूटी पार्लर सुरू करण्यास परवानगी ; या असतील अटी

5

मुंबई, दि. २६ जून २०२० : २४ मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतरच्या तीन महिन्याच्या काळामध्ये सर्वच व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्था देखील मेटाकुटीस आली होती. हे लक्षात घेता केंद्र सरकार व राज्य सरकारने अनलॉक वनच्या अंतर्गत शिथीलता देत उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली. राज्यामध्ये सुद्धा ‘मिशन बिगिन अगेन’ मोहीम राबविण्यात आली. या सर्व घडामोडीत सलून व्यवसायाला मात्र परवानगी देण्यात आली नव्हती. गेल्या काही दिवसात काही सलून व्यवसायिकांनी आत्महत्या करण्याचे प्रकार देखील समोर आले होते. हे सर्व लक्षात घेता शासनाने सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

सरकारने सलून व्यवसायिकांना दिलासा देत २८ जूनपासून सलून, ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. तसंच ब्यूटी पार्लर आणि सलून व्यावसायिकांसाठी काही अटी राज्य सरकारने घालून दिल्या आहेत.

अर्थात राज्य सरकार पुढील काही दिवस याचे परीक्षण करणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कितपत पालन होत आहे तसेच यातून संसर्गाचा धोका कितपत वाढण्याची शक्यता आहे हे बारकाईने पाहिले जाणार आहे.

काय आहेत अटी

• सलूनमध्ये केस कापण्यासाठी, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेडिंग यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

• त्वचेसंदर्भातील कोणत्याही सेवा चालकांना करता येणार नाही. तसा फलक दुकानाबाहेर लावणे बंधनकारक आहे.

• चालकांनी मास्क, हातमोजे व अॅप्रनचा वापर करणे अत्यावश्यक

• दुकानांतील वापरात येणाऱ्या खुर्च्या व टेबल सॅनिटाइज करणे, तसेच दर दोन तासांनी दुकानही सॅनिटाइज करणे बंधनकारक

• ग्राहकांची सेवा करताना पुन्हा वापरता येणार नाही असे टॉवेल वापरा. नॉन- डिस्पोजेबल वस्तू वापरल्यास त्या सॅनिटाइज करणे आवश्यक

• चालकांनी आवश्यक त्या सूचनांचा एक फलक ग्राहकांसाठी दुकानात लावावा

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा