ब्रिटनमध्ये रिलीज आधीच ‘द केरला स्टोरी’ वादात, चित्रपटाचे शो थांबवले

लंडन,युके १५ मे २०२३: द केरला स्टोरी हा चित्रपट इंग्लंड मध्ये ३१ स्क्रीन्सवर १२ मे रोजी रिलीज होणार होता. परंतु ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिले नाही, त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व वेबसाइटवरून तिकीट विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्या मुळे या चित्रपटाचा वाद आता युके मध्ये पोहोचला आहे असे दिसते.

गेल्या आठवड्यात रिलीज च्या दिवशी बर्‍याच लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी तिकिटे काढली होती. स्क्रीनिंग साठीही ९५% उपस्थिती होती, पण शेवटच्या क्षणी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. या बाबत तिकीट धारकांना एक मेल आला. त्या मेलमध्ये लिहिले होते की, ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन म्हणजेच BBFC ने या द केरला स्टोरी चित्रपटाला वयाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे बुकिंग रद्द करावे लागले. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुमचा परतावा पाठवत आहोत.चित्रपटाचे सर्टिफिकेशन अद्याप झाले नाही. वय मानांकन प्रमाणपत्र मिळताच हा चित्रपट यूकेच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

यूकेमध्ये सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीशिवाय चित्रपट दाखवणे बेकायदेशीर आहे. वितरकांनी चित्रपटाशी संबंधित तिन्ही आवृत्त्या (हिंदी, तमिळ आणि मल्याळम) सेन्सॉर बोर्डाला सादर केल्या होत्या. परंतु अद्याप सर्टीफिकेशन अद्याप झाले नाही. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर वितरकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वितरकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कळते. तसेच यूकेमधील काही हिंदू आणि जैन संघटनांनी बीबीएफसीला पत्र लिहून लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे.

केरला स्टोरी ५ मे रोजी भारतात प्रदर्शित झाली. केरला स्टोरीने भारतात १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतात या चित्रपटावरून प्रचंड वाद सुरू आहे.
द केरला स्टोरी वर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली असून तामिळनाडूतील थिएटर ऑपरेटर्सनी तो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला नोटीस बजावली आहे. गेल्या शुक्रवारी या बाबत न्यायालयात सुनावणी झाली.मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने बुधवारी पुढील सुनावणी ठेवली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा