जम्मू-काश्मिर, २० ऑगस्ट २०२३ : दक्षिण काश्मीर हिमालयीन प्रदेशातील अमरनाथ गुहेची वार्षिक यात्रा २३ ऑगस्टपासून कमी लोकसंख्या आणि रस्ते दुरुस्तीची कामे पाहता तात्पुरती स्थगित राहील. यासंदर्भात एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, भगवान शिवाची पवित्र काठी ‘छडी मुबारक’ पारंपारिक पहलगाम मार्गाने नेण्यात येईल आणि यासह यात्रेची ३१ ऑगस्ट रोजी सांगता होईल.
१ जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत ४.४ लाखांहून अधिक भाविकांनी अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किलोमीटरच्या पारंपरिक पहलगाम मार्गाने आणि गंदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटरच्या बालटाल मार्गाने बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. यात्रेकरूंच्या संख्येत घट झाल्याने आणि संवेदनशील मार्गांवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) द्वारे दुरुस्ती आणि देखभालीचे काम पाहता, यात्रेकरूंसाठी पवित्र गुहेकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यास सांगितले गेले आहे.
त्यामुळे २३ ऑगस्टपासून यात्रा दोन्ही मार्गांवरून तात्पुरती स्थगित ठेवली जाईल. छडी मुबारक पारंपारिक पहलगाम मार्गाने नेण्यात येणार असून ३१ ऑगस्ट रोजी यात्रेचा समारोप होईल. मंदिरातील नैसर्गिकरित्या तयार झालेले बर्फाचे शिवलिंग वितळल्याने २३ जुलैपासून भाविकांच्या संख्येत घट होऊ लागली. दरम्यान, येथील भगवती नगर बेस कॅम्प येथून रविवारी ३६२ भाविकांची ताजी तुकडी ११ वाहनांतून रवाना झाली. यात्रेसाठी सर्व भाविक बालटाल बेस कॅम्पकडे जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड