हौशी पुणेकरांचा मधमाशी पालनाकडे कल

पुणे १६ सप्टेंबर २०२२ : आपल्या सोसायटीच्या आवारात, बगिच्यात मधमाशांची कॉलनी, पोळे असावे अशी भावना पुण्यातील अनेक सोसायटी वाल्यांची आहे. त्यांची कारणे पण तेवढीच हौशी आहेत.

आपल्या सोसायटीतील किंवा बागेतील फुलांचा उत्तम प्रतीचे, दर्जेदार मध आपल्यालाच मिळावे असा विचार करून , पुणेकर सोसायट्या स्वतःहून मधमाशी पालक बनत आहेत. पूर्वी मधमाशांबाबत अनेक गैरसमज होते, पण त्यांना डिवचले, छेडले नाही तर त्या काहीच त्रास देत नसल्याचे हळू हळू लोकांच्या लक्षात येऊ लागले. आणि पुणेकरांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वन विभाग आणि काही बचत गटांतर्फे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जाते. पूर्वी मधाच्या व्यवसायाकरिता व्यवसायिकच प्रशिक्षण घ्यायचे. परंतु आता शहरातील मधमाशा प्रेमी वाढले आहेत.

जैवसाखळीतील ‘परागी करण’ कार्यात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या मधमाशांचे पोळे आपल्या बाल्कनीत, सोसायटीच्या आवारात, बागेत असावे आणि आपल्याला, घेतलेल्या प्रशिक्षणा द्वारे योग्य पध्दतीने औषधी असा ‘मधुरस’ म्हणजे मध मिळवता यावा या साठी पुणेकर मंडळी सरसावले आहेत.

साधारणतः सात दिवसांच्या मधमाशी पालन प्रशिक्षणात मधमाशांचे निसर्गातील स्थान, परागीभवनातील त्यांचे कार्य, याबरोबरच मध निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती दिली जाते. प्रशिक्षणार्थींना मधमाशांच्या पेट्यांची,पोळ्यांची देखभाल, मध काढणे याबाबत मार्गदर्शन केले जाते.

याशिवाय मधमाशांचे संरक्षण आणि संवर्धन करून, पर्यावरणाला मदत करणारे, पर्यावरण प्रेमी पुणेकर सुद्धा या मोहिमेत हिरीरीने सहभागी आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा