आंबेगाव तालुक्यातील चार गावात कोरोनाचे रुग्ण

आंबेगाव, दि.२४,मे २०२०: आंबेगाव तालुक्यात कोरोनाने काही दिवसांपुर्वी शिरकाव केला असून तालुक्यातील साकोरे, शिनोली या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता तालुक्यातील निरगुडसर,जवळे तसेच शिनोली, या गावात प्रत्येकी एक रुग्णसापडल्याने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुक्यातील रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तीनही रूग्ण हे काही दिवसांपूर्वी मुंबईवरून आपल्या आपल्या गावी आले होते. गावी आल्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाइन केले होते. त्यानंतर सदर व्यक्तीला खोकला व श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला याबाबत आरोग्य विभागाला कळवले असता, त्या व्यक्तीना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर आज दि. २४ रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने या सर्व गावात जाऊन गावे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

निरगुडसर येथे आलेली व्यक्ती ही पुतणीच्या लग्नासाठी बायको मुलासह मुंबई येथून दिनांक १९ रोजी आली होती. आल्यानंतर या व्यक्तीला स्थानिक आरोग्य विभागाने होम क्वारांटाइन होण्यास सांगितले होते. त्यानंतर काही दिवसानंतर या व्यक्तीला खोकला व अशक्तपणाचा त्रास होऊ लागल्याने या व्यक्तीला मंचर येथे रुग्णालयात नेले असता, त्रास वाढल्याने त्यांना पुणे येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी या व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.सदर कुटुंबात हळदीचा कार्यक्रम झाल्याने या व्यक्तीचे कुटुंब एकत्र असल्याने या व्यक्तीच्या संपर्कात ५० ते ६०व्यक्ती आल्या असून त्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच निरगुडसर गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून पुढील आदेश येईपर्यंत गाव बंद राहणार आहे.

जवळे येथील रुग्ण अंदाजे दहा ते बारा दिवसापूर्वी मुंबई येथून आपल्या पत्नी व मुलासह गावी आला होता.गावी आल्यानंतर त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते, मात्र काही दिवसानंतर त्याला जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्याला मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी रुग्णाला पुणे येथे नेण्यास सांगितले. पुणे येथे नेल्यावर या रुग्णाचा तीन दिवसानंतर चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण कुटुंबातील २० ते २५ लोकांच्या संपर्कात आल्याने त्यां सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून जवळे गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

शिनोली येथील रुग्ण १७ तारखेला आपली बायको आईसह मुंबई घाटकोपर येथून आपल्या गावी आला होता. त्यानंतर तो गावातील अनेकांच्या संपर्कात आला होता काही दिवसानंतर त्याला ताप येऊ लागल्याने तो मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात चेकअप साठी आला होता. नंतर तो पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल झाला असता, आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गावातील ५० ते ६० व्यक्तींच्या संपर्कात आला असल्याने या सर्वांची माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी – साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा