रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळली, प्रवाशांनी पर्यायी मार्ग वापरण्याच्या प्रशासनाच्या सूचना

3

पोलादपूर २८जून २०२३: कोकणात पावसाने गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचले आहे. काल रात्री रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानंतर अखेर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कालिकामाता पॉइंटजवळ ही दरड कोसळली आहे. काल रात्री ११ वाजता आणि सकाळी ७ वाजता अशी दोन वेळा दरड कोसळली आहे. याच मार्गाने महाबळेश्वरकडे जाता येते. दरड कोसळल्यानंतर येथील रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ताम्हणी घाटातून पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे. या पर्यायी मार्गाचा किंवा इतर मार्गाचा प्रवाशांनी वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रायगडमध्ये अति जोरदार पावसाचा इशारा
दरम्यान, येत्या काही दिवसात रायगडमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रायगड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटणार आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा