पुणे, ४ जुलै २०२३ : पावसाळ्याचा ऋतू हा जसा पाणी आणि शेती साठी सुखदायक आहे. तसाच अनेक आजारांनाही आमंत्रण देत असतो. पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरतात. या ऋतूत रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, काळजी घेतली नाही तर अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. जसे की सामान्य आजार ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार तर पसरतातच. पण त्याचबरोबर पसरणारा आणखी एक रोग म्हणजे अमिबियासिस.
अमिबियासिस हा रोग नेमका काय आहे?
अमेबियासिस हा एंटामोईबा-हिस्टोलिटिका नावाच्या प्रोटोझोआमुळे होणारा आतड्यांवरील परजीवी संसर्ग आहे. या आजाराला ‘अमीबिक डिसेंट्री’ असेही म्हटले जाते. हा रोग जेव्हा होतो तेव्हा पोट दुखणे आणि मल सैल होणे यांसारखी काही लक्षणं दिसतात. अमिबियासिस किंवा अमीबिक डिसेंट्री, हा एक आतड्यांसंबंधी संसर्ग आहे ज्यामध्ये परजीवी एंटामोईबा-हिस्टोलाइटिका आतड्यांमध्ये संसर्ग करते. किमान सहा वेगवेगळ्या एंटामोएबा प्रजाती मानवी आतड्याला संक्रमित करू शकतात, परंतु केवळ ई. हिस्टोलिटिका रोगास कारणीभूत ठरू शकतात.
ज्या ठिकाणी योग्य स्वच्छता नसते अशा ठिकाणी या रोगाचं प्रमाण जास्त असतो. हा रोग मोठ्या आतड्यात शिरकाव करतो. त्यानंतर शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करतो. अमेबियासिसने पीडित व्यक्तीच्या पोटात हा रोग झाल्यानंतर १ ते ४ आठवड्यांनंतर याची लक्षणे दिसतात. असे असले तरी फक्त १० ते २० टक्के लोक अमेबियासिसमुळे आजारी पडतात. परजीवी जीवाणूंमुळे होणारा अमेबियासिस हा मुख्यता पाण्यापासून होणारा आजार आहे. हा रोग संक्रमित पाणी पिणे आणि दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. ज्या ठिकाणी योग्य स्वच्छता नाही अशा ठिकाणी या रोगाचं प्रमाण जास्त असते.
अमेबियासिस रोगाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. अनपेक्षित वजन कमी होणे, उच्च ताप येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, भूक न लागणे, ओटीपोटात प्रचंड वेदना आणि जळजळ होणे, अतिसाराचे वाढते प्रमाण, स्टूलसह तीव्र रक्तस्त्राव, उजव्या ओटीपोटात तीव्र वेदना जाणवते.
या आजारातून बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी हात धुतल्यानंतरच अन्नपदार्थांचं सेवन करा. बाहेरून आलेली फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुवा. टॉयलेट सीट नियमितपणे स्वच्छ करा. पावसाळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरणे टाळा. अमिबियासिस इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, ज्यामुळे यकृताच्या फोडांसह जीवघेणा परिणाम होतो. समस्या टाळण्यासाठी आणि आजाराचा प्रसार टाळण्यासाठी, त्वरित ओळख आणि उपचार आवश्यक आहेत. अमीबियासिसचे हानिकारक परिणाम टाळण्यासाठी विशेष- कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे