नांदेडमध्ये अमित शाह आणि पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

नांदेड,१० जून २०२३ : केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात ३० जूनपर्यंत भाजपने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याच अनुषंगाने आज भाजपची नांदेडमध्ये सभा होत आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही या सभेला हजर राहणार आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी काही धक्कादायक विधानेही केली होती. त्यामुळे या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि अमित शाह पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत असल्याने आजच्या नांदेडमधील सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

आज (१०, जून) संध्याकाळी ६ वाजता नांदेडच्या तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजपचे नेते अमित शाह संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला ४० हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याला गेल्या होत्या. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित पंकजा मुंडे यांनी, मी भाजपची आहे. भाजप माझा पक्ष थोडीच आहे, असे विधान केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी घुमजावही केले. मी तसे म्हणालेच नाही, माझ्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला होता.

ही चर्चा थांबत नाही तोच पंकजा मुंडे यांची राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनि भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले गेले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात अमित शाह माझे नेते आहेत. मी लवकरच त्यांना भेटून त्यांच्याशी बोलणार आहे असे म्हटले होते. त्यानंतर योगायोगाने आज पंकजा मुंडे आणि अमित शाह हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. नांदेडच्या सभेच्या निमित्ताने या भेटीचा योग आला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आजच्या सभेमध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.

भाजपकडून २०२४ च्या लोकसभेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. नांदेडमधील अमित शाह यांच्या सभेच्या माध्यमातून आजपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील ४८ मतदारसंघात ४८ सभा होणार आहे. नांदेडपासून त्याची सुरुवात करत आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा