गुजरात १७ जून २०२३: बिपरजॉय चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातच्या कच्छ आणि जखाऊ बंदराला भेट देणार आहेत. प्रथमता गृहमंत्री अमित शहा, वादळ बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत. त्यानंतर ते शेल्टर होमला भेट देतील आणि तेथील लोकांची भेट घेतील. पुढे अमित शहा, भुज येथील स्वामी नारायण मंदिराला भेट देतील आणि बाधित लोकांसाठी अन्न साहित्य आणि इतर सुविधांचा आढावा घेतील. शेवटी मुख्यमंत्री आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळून प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या, प्रचंड मुसळधार पाऊस पडला, वेगाने वाहणारे वारे-वादळ यामुळे गुजरातच्या कच्छ, जखाऊ, मांडवी या भागात चक्रीवादळाने भीषण तांडव केले. चक्रीवादळामुळे तब्बल ६०० झाडे पडली आहेत. तर अनेक विजेचे खांब कोसळले आहे.
लोकांच्या संरक्षणासंदर्भात सरकारने पूर्वीच तयारी केली होती. हजारों लोकांना आधीच स्थलांतरित केल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. तरीही या चक्रीवादळात दोघांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले. एकूणच या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या भागाच्या दौऱ्यावर येणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर