नाशिकमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

13

नाशिक, २८ डिसेंबर २०२२ : नाशिक शहरातल्या मनसेतून शहर समन्वयक सचिन भोसले आणि त्यानंतर विभाग अध्यक्षांसह माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी ५६ शाखाध्यक्षांशी ‘वन टू वन’ संवाद साधला आहे. तर काही मनसैनिकांवर नव्याने जबाबदारी सोपविली जाणार असल्याने त्यांच्याशी आज अमित ठाकरे संवाद साधणार आहेत.

राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. अमित ठाकरे यांनी आतापर्यंत नाशिकचा तीन वेळा दौरा केला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या विधार्थी सेनेचे अध्यक्षपद आहे.

ठक्कर बाजार येथील राजगड कार्यालयात बंद दाराआड शाखाध्यक्षांशी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांनी पक्ष पुनर्बांधणी; तसेच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असावी, याबाबत पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर बहुतांश शाखाध्यक्षांनी शिंदे गट किंवा भाजपसोबत युती करण्याविषयी मतप्रदर्शन केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर