अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम

नवी दिल्ली, १ जुलै २०२१: आणखी एक ओझं कोरोना संकटाच्या काळात महागाईला सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्यावर पडणार आहे. गुरुवारी, १ जुलैपासून अमूल दूध प्रति लिटर २ रुपयांनी महाग होईल. आज पासून अमूल दूध नवीन दरासह देशातील सर्व राज्यात उपलब्ध होईल. अमूलची सर्व दुधाची उत्पादने अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताझा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिममध्ये प्रतिलिटर २ रुपये वाढ होईल.

म्हणजेच १ जुलैपासून दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर राज्यात अमूल दूध महागड्या किंमतीत उपलब्ध होईल. जवळपास दीड वर्षानंतर, अमूलनं या किंमती वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवीन किंमतीची अंमलबजावणी झाल्यानंतर अमूल गोल्डचे दर लिटरमागं ५८ रुपये होतील.

महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दीड वर्षांपासून लोकांच्या कामावर बरेच परिणाम झाले आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही सतत वाढत आहेत, देशातील बर्‍याच भागात पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकलं जात आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम दुधाच्या दरावर पडताना दिसत आहे. लॉकडाऊन आणि अनलॉक करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, बाजारपेठा सतत उघडत आणि बंद होत आहेत, अशा परिस्थितीत लोकांच्या रोजगारावर सुरू असलेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वाढती महागाई ही नवीन चिंता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा