पाकिस्तान (सिंध), १ सप्टेंबर २०२२: पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर (हिंदू, शीख) अत्याचाराचं आणखी एक वेदनादायक प्रकरण समोर आलंय. ८ वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांवर वार करण्यात आले असून त्यामुळं तिच्या दोन्ही डोळ्यांतून सतत रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांच्या मते, तिच्या जगण्याची शक्यता फारच कमी आहे.
हे प्रकरण पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. २८ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांना त्यांची ८ वर्षांची मुलगी अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. सध्या तिला उमरकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. येथे डॉक्टरांनी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी केलीय. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांवर चाकूने वार करण्यात आलेत.
मुलीला रुग्णालयात दाखल केलं तेव्हाही तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त वाहत होतं. मुलीचं जगणं कठीण असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.
सिंध प्रांतात राहणाऱ्या हिंदूंवर बलात्कार, खून, अपहरण अशा अत्याचाराच्या बातम्या आल्या आहेत. अगदी गेल्या आठवड्याची गोष्ट आहे. एका हिंदू सफाई कामगाराला ईशनिंदा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. यापूर्वी त्याच्यावर इस्लामिक अतिरेक्यांनी हल्ला केला होता, तेथून तो कसा तरी बचावला होता.
अशोक कुमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानने (टीएलपी) त्याच्याविरोधात पाकिस्तानात निदर्शनं केली होती. अशोकवर हैदराबाद (पाकिस्तानचे ठिकाण) येथे ईशनिंदा केल्याचा आरोप होता. TLP आंदोलकांनी रविवारी सिंधमध्ये काही हिंदू कुटुंबं राहत असलेल्या इमारतीलाही घेराव घातला. पोलिसांनी जमावाला तेथून कसंबसं हटवलं.
त्याचवेळी, काही महिन्यांपूर्वी एका १८ वर्षीय सिंधी हिंदू मुलीवर रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यापूर्वी सिंधमध्येच एका हिंदू मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तत्पूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा गळाही कापण्यात आलाय.
आकडेवारीनुसार, सिंधमध्ये १९४७ मध्ये म्हणजेच फाळणीच्या वेळी १३ टक्के हिंदू होते. मात्र अशा अत्याचारांमुळे तेथून स्थलांतराला वेग आलाय. आता तेथे सुमारे १.५ टक्के हिंदू असल्याचं सांगितलं जातं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे