पाटसमध्ये खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळला

पाटस (ता. दौंड), १४ मार्च २०२३ : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी पाटस येथे खासदार संजय राऊत यांचा निषेध करीत पुतळा जाळण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाटस येथील भीमा साखर कारखाना चौकात आज सकाळी ११ वाजता आमदार राहुल कुल समर्थक एकत्र आले. खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते खोटे आहेत तर आमदार राहुल कुल यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून अतिशय कठीण परिस्थितीतून भीमा साखर कारखाना सुरू केला आहे.

आमदार राहुल कुल यांचा राज्यात नावलौकिक होत असताना राजकीय सूडभावनेतून त्यांच्यावर आरोप होत असल्याचे यावेळी कुल गट समर्थक बोलत होते. यावेळी राऊत यांचा निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी झालेल्या निषेध सभेत संभाजी देशमुख, डॉ. मधुकर आव्हाड, बाळासाहेब तोंडे पाटील, हनुमंत शितोळे आदी उपस्थित होते. यावेळी कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पाटस पोलिस तैनात करण्यात आले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा