हिंगोली, २२ जुलै २०२३ : हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागात इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतल्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आज पहाटे ही घटना घडली. शहरातील आझम कॉलनी भागांमध्ये शेख अफरोज हबीब यांचे घर असुन त्यांनी काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती.
नेहमीप्रमाणे आज पहाटे चार वाजता त्यांनी घरांमध्ये स्कूटर चार्जिंगला लावली, सात वाजता चार्जिंगची वायर काढल्यानंतर अफरोज हे घरात काम करत होते. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच घरात अचानक धूर झाला. स्कूटरची बॅटरी पेटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घरात झोपलेल्या मुलांना बाहेर काढले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घरातील सर्वजण घाबरुन गेले. घरामध्ये आग व धूर पसरला होता. अफरोज व शेजाऱ्यांनी आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
घटनेनंतर स्कूटर ओढून घराच्या बाहेर काढण्यात आली. स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास पाटील, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर