वीर शिवा काशिद

एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते,शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे !
 लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी मनाशी खुणगाठ बांधून समोर साक्षात मृत्यू उभा टाकलेला असतानाही स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे नाभिक समाजाचे रत्न स्वामीनिष्ठ नरवीर शिवबा काशीद यांची 359 वी पुण्यतिथी निमित्त विन्रम अभिवादन आणी मानाचा मुजरा

वीर शिवा काशिद यांचा जन्म पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर गावातील नाभिक कुटुंबात झाला होता.

१२ बलुतेदारांना शिक्षण त्यांच्या घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दैनंदिन सराव असे. मजबूत बांधा , सरळ नाक , तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढणे या सर्व गोष्टींमध्ये शिवा काशिद पटाईत होते. या सर्वां व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवा काशिद हे हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. शिवा काशिद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये न्हावी म्हणून काम करत होते. शिवा काशिद हे हुबेहूब महाराजांसारखे दिसत होते का हे सांगणे तसे कठीण आहे परंतु महाराजांना वाचवण्यासाठी त्यांनी महाराजांचा पोषाक परिधान केला होता. तसेच येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव जास्त होता. शिवकाळात फारसी भाषा चालत असे व आजूबाजूच्या मिश्र समाजात दख्खनी हिंदी चालत असे.

दख्खनी हिंदी म्हणजे फारशी व मराठीचे मिश्रण, ज्यात दक्षिणेतील तेलगू, कन्नड या भाषांचाही शब्द उच्चार मिश्रित झाला होता. फारशी भाषेत काशीद हा शब्द आढळतो. यामध्ये अशा प्रकारचे दोन शब्द फारशी भाषेमध्ये आढळून येतात. त्यातील एक आहे कसीद हा शब्द या शब्दाचा अर्थ होतो पत्र वाहक किंवा संदेश वाहक. तर याचा दुसरा अर्थ असा होतो की खोटा किंवा नकली. हा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ज्याप्रमाणे शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांचे सोंग घेऊन महाराजांना वाचवले होते त्याअर्थी शिवा कसिद म्हणजेत नकली शिवा या अर्थाने त्यांना संबोधले गेले असणार. अर्थातच हा केवळ एक तर्क मांडला आहे. बाकी या विषयी त्यांचे नाव शिवा काशिद होते की वेगळे याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग प्रामुख्याने विजापूरच्या आदिलशहाच्या अमलातील प्रदेशात चालू होता. शिवराय आणि आदिलशहा यांच्या पहिल्या उघड संघर्षात पुरंदरावर विजापुरी सेना पराभूत झाली. आदिलशाहीच्या सामर्थ्याला न जुमानता शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून जावळी बळकावली. स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच उरात धडकी भरलेल्या आदिलशाहीने प्रचंड फौज फाटा देऊन स्वराज्यावर पाठविलेला अफझलखान शिवरायांनी प्रतापगडाजवळ ससैन्य संपविला. हा प्रचंड पराभव आदिलशहाला अतिशय झोंबला. अफझल वधानंतर स्वराज्याच्या सीमा विजापूरच्या दिशेने वाढवत शिवरायांनी पन्हाळा हा बलाढ्य आणि मोक्याचा किल्ला जिंकला.

आदिलशहाने पुन्हा फौज देऊन सिद्दी जौहर या चिवट लढवय्या सरदारास शिवरायांवर पाठविले. सिद्दीने पन्हाळ्यास वेढा घातला. या परिसरातील प्रचंड पावसाळ्यात वेढा चालविणे विजापुरी फौजेला अशक्य होईल हा पन्हाळ्यावर असलेल्या महाराजांचा अंदाज चिवट सिद्दी जौहरने खोटा ठरविला. वेढा अधिकच कडेकोट करून सिद्दी गडाखाली ठाण मांडून बसला. मराठ्यांनी वेढ्याबाहेरून केलेल्या हल्ल्यांना मोडून काढीत सिद्दी गडावर मारा करू लागला. वेढ्यात अडकून चार महिने झाले आणि शिवरायांनी यापुढे पन्हाळ्यात रहाणे स्वत:ला आणि राज्याला अपायकारक ठरणार हे ओळखून वेढ्यातून निसटून जायचे ठरवले. तहाची बोलणी चालू करून काही प्रमाणात शिवरायांनी सिद्धीचे सैन्य गाफील बनविले. पन्हाळ्यातून बाहेर पडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला.

दिनांक १२ जुलै १६६० रोजी आषाढी पौर्णिमेची रात्र होती. अंदाजे रात्रीचे दहा वाजले असतील. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निघण्यास तयार होते. महाराज पालखीत बसले. मावळ्यांनी पालखी उचलली व पन्हाळ्यावरून निघण्यास सुरुवात केली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत ६०० निवडक मावळेही ही महाराजांसोबत निघाले. याच बरोबर दुसरी एक पालखी निघाली. या पालखीत होते शिवा काशीद. हुबेहूब महाराजांसारखे दिसणारे. वादळ आणि विजांचा कडकडात चालूच होता. रात्रीच्या काळोखामुळे विजांचा लख्ख प्रकाश मधून मधून पालखीवर पडत होता. मुसळधार पावसामध्ये मावळे पालखी खांद्यावर घेऊन गड उतरत होते. पालखी जरा आडवाटेने खाली येत होती. पालखीला वाट दाखवण्यासाठी काहीजण पुढे पुढे चालत होते.

पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे व वादळामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पाऊस इतका जोरात होता की लांबच्या अंतरावरील दिसणे कठीण झाले होते. अशा स्थितीत मोर्चावर असलेले शाही सैनिक गारठले होते. शिवाजी महाराज तसेही आपल्याला शरण येणार आहेत या भ्रमात राहून ते गाफील झाले होते. वेढा घालून बसलेले सैनिक हळूहळू बेसावध होत चालले होते. जमेल तसा आडोसा घेत हे सैन्य आराम करत होते. तर दुसरीकडे मावळे वादळ वा-याच्या पावसातही घामाघूम झाले होते. कारण त्यांच्या खांद्यावर अवघ्या स्वराज्याची जबाबदारी होती. त्यांची एक चूक या स्वराज्याचे दैवत पणाला लावणारी होती.

झाडाझुडपातून आणि खच खळग्यातून महाराजांची पालखी विशाल गडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखलखत होत्या आणि एकीकडे पालखी धावत होती. समोर वेढ्याच्या पहारा उभा होता. मावळ्यांच्या नजरा भिरभिरत होत्या. अखेर पहारा जवळ आला. महाराजांची पालखी पहाऱ्यातून बाहेर काढणे सर्वात जोखमीचे काम होते. पहार्‍याच्या संदीसापट्यातून महाराजांची पालखी बेमालूमपणे वेढा भेदून पार गेली. धोका टळला असे समजून मावळे निश्चित झाले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. वाटेच्या दोन्ही बाजूंनी घनदाट झाडे होती. रात्रीची भयाण शांतता आणि मुसळधार पाऊस मावळ्यांसाठी विचित्र अनुभव ठरत होता. मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या जंगलांमधून मधेच एखाद्या वाघाची डरकाळी कानावर येत. डरकाळी कानावर येताच मावळ्यांचे काळीच भीतीने चिरले जाई. परंतु धोका बर्‍यापैकी कमी झाला असे समजत ते वेगाने पालखी साठलेल्या पाण्यातून आणि चिखलातून कसेबसे पुढे नेत होते. मावळ्यांना असे वाटत होते की मुसळधार पावसात आणि रात्रीच्या घनघोर अंधारात सिद्धी जोहरच्या सैनिकांना पालखी दिसणे अशक्य आहे.

पालखी काही अंतरावर गेल्यावर जोहरच्या हेरांनी पालखीस बघितले. पालखी बघताच सिद्धी जोहरच्या हेरांनी वेढ्या कडे धाव घेतली. सिद्धी जोहरला त्यांनी ही बातमी लगोलग दिली. गनिम…गनिम… असे ओरडत त्यांनी जोहरला सर्व माहिती दिली. हे ऐकून जोहरला मोठा धक्काच बसला होता कारण गेल्या साडेचार महिन्यांची मेहनत वाया जाताना त्याला दिसत होती. जोहरच्या पुढे सिद्धी मसूद उभा होता. सिद्धी मसूद हा जोहरचा जावई होता. त्याच्याकडे इशारा करतात जोहरने त्याला पालखीचा पाठलाग करण्यास सांगितले. दोन हजार घोडेस्वार आणि एक हजार पायदळ घेऊन मसुद पालखीच्या मागे निघाला. मावळ्यांना हे कळताच त्यांचे काळीज धडधड करू लागले. त्यांच्या अपेक्षा पेक्षा आधीच सैन्यांनी पालखीला हेरले होत. ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन पंधरा वीस जण मुख्य रस्त्याने धावू लागले. महाराज ज्या पालखीत होते ती पालखी विशाळगडाच्या दिशेने आड वाटेने जाऊ लागली. पंधरा-वीस जण पालखी घेऊन जात असताना मसूदच्या सैन्यांनी बघितले. ते बघून मसूद व त्याचे सैन्य खुश झाले. शिवाजी…शिवाजी… असे ओरडते पालखीच्या मागे निघाले. काही क्षणात पालखी घेरली गेली. पंधरा वीस मावळे आणि समोर तीन हजाराच्या आसपास सैन्य उभे होते. मसूदने मावळ्यांना विचारले पालखीत कोण आहे. मावळ्यांनी उत्तर दिले शिवाजी महाराज. मसूद खुश झाला पळून जाणारा शिवाजी मी पुन्हा पकडला या आनंदात तो भारावून गेला होता.

पालखी पुन्हा पन्हाळ्याच्या दिशेने निघाली. महाराजांना पकडून आणल्याची बातमी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धी जोहर पर्यंत पोहोचली. हे ऐकून सिद्दीजोहरला विलक्षण आनंद झाला. पालखी सिद्धी जोहरच्या समोर आणली गेली. पालखीतील शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला रात्रीच्या अंधारात कोणाला काही समजले नाही परंतु तेथे उपस्थित असलेल्या काहीजणांनी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष बघितले होते. पालखीत असलेला इसम हा शिवाजी महाराज नव्हे याची खात्री झाली. त्याची चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर सिद्धीला समजले की हा शिवाजी नसून त्याच्या वेशात असलेला कोणीतरी न्हावी आहे. सिद्धीची तळपायाची आग मस्तकाला गेली. पश्चाताप आणि रागाने तो लालबुंद झाला होता. त्याने शिवा काशिद यांना विचारले की तुला मरणाची भीती वाटत नाही का. यावर शिवा काशीद सिद्धीला उत्तर देत म्हणाले की, माझ्या धन्यासाठी मी हजार वेळा सुद्धा मरण पत्करेल. हे ऐकून सिद्धिचा पारा आणखीनच चढला. त्याने शिवा काशीद यांना शिरच्छेद करण्याची शिक्षा फर्मावली. सिद्धी समोर आता फक्त पश्चाताप, चिडचिड आणि राग एवढेच शिल्लक राहिले होते. रागात ओरडत त्याने पुन्हा महाराजांचा पाठलाग करण्यासाठी २००० घोडदळ व १००० पायदळ पाठवले. मुसळधार पावसात गुडघ्या इतक्या चिखलामध्ये पाय रोवत रोवत सिद्धीचे सैन्या महाराजांचा पाठलाग करत विशाळगडाच्या दिशेने निघाले.

शिवा काशिद यांनी दिलेल्या प्राणांची आहुती आणि दाखवलेले धाडस इतिहास कदापि विसरू शकणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे स्वप्न पुढच्या काळात अनेक वर्ष तेवत राहिले. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शिवा काशीद यांची समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी उभारण्यात आली आहे. समाधी भोवतालचा परिसर विकसित करण्यात येत आहे. त्यांची ही समाधी सतत त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत राहील.

संदर्भग्रंथ: राजा शिवछत्रपती,
स्त्रोत: विविध लेख व मिळवलेली माहिती

– ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा