जालन्यात वाईन शॉपीच्या कर्मचाऱ्यावर रस्त्यात अडवून अज्ञातांनी गोळी झाडली

4

जालना २५ जून २०२३: अंबड-मार्डी रोडवर वाईन शॉप कर्मचारी दुचाकीवर घरी जात असताना, चोरट्यांनी मागून येऊन दुचाकी आडवी लावून वाईन शॉप कर्मचाऱ्यांची बॅग हिस्कवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाईन शॉप कर्मचाऱ्यांने प्रतिकार केल्याने चोरट्यांनी बंदूक काढून गोळीबार केला. यामध्ये वाईन शॉप कर्मचारी राधाकिसन पुंडलिक पिवळ, वय ५२ रा. किनगाव अंबड गंभीर जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर चोरटे पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड शहरातील ओल्ड फ्रेंड वाईन शॉपीचे मॅनेजर राधाकिसन पुंडलिक पिवळ शनिवारी रात्री दुकान बंद करून त्यांच्या गावी किनगाव येथे मोटरसायकल वरुन निघाले होते. या दरम्यान अंबड-मार्डी रोडवरील चव्हाण यांच्या मळ्याजवळ पाठीमागून आलेल्या दोन जणांनी त्यांना अडवले. त्या दोन जणांनी पिवळ यांच्याजवळील बॅग हिस्कवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी जोराचा प्रतिकार केला.

संतप्त झालेल्या त्या अज्ञात इसमांपैकी एकाजणांने स्वतःजवळ असलेल्या गावठी पिस्तूलातून एक गोळी झाडली. यामध्ये पिवळ हे गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्यानंतर त्या इसमांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पिवळ यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गोळी लागली असून, त्यांच्यावर संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा