विमानातून उतरण्यापूर्वीच प्रवाशाने उघडले एक्झिट गेट; प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, २९ जानेवारी २०२३ : काहीवेळा लोकांच्या बालिश कृतीमुळे इतरांचा जीव धोक्यात जातो. अशीच एक घटना महाराष्ट्राची राजधानी मुंबईत घडली. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका प्रवाशाने उतरण्यापूर्वीच एक्झिट गेट उघडले. हे पाहून फ्लाइटमध्ये बसलेले इतर प्रवासी आणि क्रू मेंबर्सना धक्काच बसला. क्रू मेंबरने घाईघाईने प्रवाशाला गेटजवळून बाजूला करून गेट बंद केले. त्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुंबई विमानतळ पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना मुंबई विमानतळ पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी (ता. २४) प्रणव राऊत नामक एक व्यक्ती नागपूरहून मुंबईला ‘इंडिगो एअरलाइन्स’च्या ‘फ्लाइट ६ई-५२७४’ने येत होती. तेव्हा प्रणव राऊतने मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वीच एक्झिट गेट उघडले. माहिती मिळताच विमानतळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रवाशाला अटक केली.

स्वतःबरोबरच विमानातील इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याने प्रवासी प्रणव राऊतविरुद्ध आयपीसी कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुंबई विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रणव राऊतला एअरक्राफ्ट ॲक्ट-१९३७ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

‘इंडिगो एअरलाइन्स’ने एक प्रेस नोट जारी करून म्हटले आहे, की नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या ‘फ्लाइट ६ई-५२७४’मधील प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा विमान हवेत होते आणि लँडिंगसाठी येत होते. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सनी कॅप्टनला घटनेची माहिती दिली आणि प्रवाशाला सावध करण्यात आले. तत्पूर्वी, फ्लाइटचे आपत्कालीन गेट भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी चुकून उघडले होते आणि त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा