पुणे, १८ डिसेंबर २०२२: भारताच्या सर्वात लांब पल्ल्याच्या आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-५ ची रेंज वाढवण्यात आलीय. पूर्वी त्याची रेंज ५००० किमी होती. आता ते ७००० किलोमीटरहून अधिक अंतर गाठू शकते. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने क्षेपणास्त्रातील स्टीलच्या जागी संमिश्र साहित्य आणलं. त्यामुळं क्षेपणास्त्राचं वजन २० टक्क्यांहून अधिक कमी झालं.
संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सरकारला अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची रेंज ७००० किमी पेक्षा जास्त वाढवायची आहे. त्यामुळंच डीआरडीओने या क्षेपणास्त्रावर पुन्हा काम केलं. आता हे क्षेपणास्त्र सांगितलेली रेंज गाठू शकतं. अग्नी मालिकेच्या उर्वरित क्षेपणास्त्रांबाबतही असंच केलं जाईल, अशी अपेक्षा आहे.
उदाहरणार्थ, अग्नि-३ चे वजन ४० टन आहे पण ते ३००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. अग्नी-४ चे वजन फक्त २० टन आहे, ते अधिक श्रेणी व्यापतं. क्षेपणास्त्रांच्या वाढलेल्या रेंजचा फायदा देशाच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडला मिळतो. कारण त्यांच्याकडं अधिक श्रेणी आणि सामर्थ्य भिन्नता आहे. भारताचा न्यूक्लियर वेपन प्रोग्राम डेटरेंस आहे. म्हणजेच, पहिला हल्ला आमच्याकडून होणार नाही, समोरून हल्ला झाल्यास पूर्ण क्षमतेने हल्ला केला जाईल.
दुसरी स्ट्राइक क्षमता देखील लवकरच विकसित केली जाईल. नुकतीच अग्नी-५ ची एक्सटेंडेड रेंज टेस्ट घेण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. म्हणूनच अग्नी-५ ची चाचणी ५४०० किमी अंतरापर्यंत करण्यात आली. नवीन बदलांमुळं काय फरक पडतो हे तपासण्यासाठी ही चाचणी केली गेली होती. कारण हे क्षेपणास्त्र आधीच्या क्षेपणास्त्रापेक्षा हलकं होतं.
अग्नी-५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. हे देशाचे एकमेव क्षेपणास्त्र आहे, ज्याच्या रेंजमध्ये रशियाच्या वरच्या भागापासून, आफ्रिकेचा अर्धा भाग, ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग, ग्रीनलँडपर्यंत सर्व काही व्यापलं जाईल. हे DRDO आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे तयार केलंय. अग्नी-५ क्षेपणास्त्राचं वजन ५० हजार किलो होतं. त्याचं वजन २० टक्क्यांहून अधिक कमी झालंय. ते १७.५ मीटर लांब आहे. त्याचा व्यास २ मीटर म्हणजेच ६.७ फूट आहे. त्याच्या वर १५०० किलो वजनाचं अण्वस्त्र बसवलं जाऊ शकतं.
या क्षेपणास्त्रात तीन स्टेज रॉकेट बूस्टर आहेत जे सॉलिड फ्यूलसह उडतात. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २४ पट जास्त आहे. म्हणजेच ते एका सेकंदात ८.१६ किलोमीटरचं अंतर कापतं. ते ताशी २९,४०१ किलोमीटर वेगानं शत्रूवर हल्ला करतं. हे रिंग लेझर जायरोस्कोप इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम, जीपीएस, नेव्हीआयसी सॅटेलाइट गाइडेंस सिस्टमने सुसज्ज आहे. अग्नि-५ क्षेपणास्त्र अचूकपणे लक्ष्यावर मारा करतं.
या क्षेपणास्त्राची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचं MIRV तंत्रज्ञान (मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल्स). या तंत्रात क्षेपणास्त्रावर बसवलेल्या वॉरहेड्सची संख्या वाढवता येते. म्हणजेच क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यांना लक्ष्य करू शकतं. हे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये तैनात करण्यात आलंय. भारताची सर्व क्षेपणास्त्रं केवळ याच आदेशाखाली चालतात. यामध्ये पृथ्वी, अग्नी आणि सूर्यासारख्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. सूर्या क्षेपणास्त्र अजून बनलेले नाही. त्याची रेंज १२ ते १६ हजार किलोमीटर असेल. त्याआधी अग्नी-६ तयार केलं जाईल जो ८ ते १२ हजार किलोमीटरचा पल्ला असेल. समुद्रातील लष्करी क्षेपणास्त्रांचाही या कमांडमध्ये समावेश आहे. जसं- धनुष, सागरिका इत्यादी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे