अंबाजोगाई इथं उभारणार स्वतंत्र पासोडी भवन

अंबाजोगाई, १५ सप्टेंबर २०२० : दासोपंतांची पासोडी मराठी साहित्यात अत्यंत प्रसिद्ध आहे. तिच्या जतनासाठी आता अंबाजोगाई इथं स्वतंत्र पासोडी भवन उभारण्यात येणार आहे. काय आहे ही पासोडी आणि कसा आहे हा प्रकल्प, हे पाहणे योग्य ठरेल.

मराठी साहित्य विश्वातील अनमोल ठेवा समजली जाणारी ‘दासोपंतांची पासोडी’ जतन करण्यासाठी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं ‘पासोडी भवन’ उभारण्यात येणार आहे. मध्ययुगीन नाथपंचकांपैकी एक असणारे दासोपंत म्हणजे दासो दिगंबर देशपांडे हे संत एकनाथांना समकालीन असणारे आणि विपुल साहित्य संपदा निर्मिलेले संतकवी. दत्तात्रेयांचे उपासक असलेले आणि सर्वाधिक लेखन करणारे मराठी संतकवी असं बिरूद मिळवलेल्या दासोपंतांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत आहे.

दिगंबरानुचर या टोपणनावानंही लेखन केलेल्या दासोपंतांच्या वाङ्ममय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण पासोडी. ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद अशा कापडावर वेदांतातील पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय उत्तम चित्रकार असलेल्या दासोपंतांनी चित्राकृतींतून मांडलेला आढळतो. वेदांतावर सूक्ष्मपणे, विस्ताराने विवरण करणारी, आकृत्या असलेली ही एकमेव चित्रमय वाङ्मयीन रचना असावी. त्यामुळे ही पासोडी मराठी संतवाङ्मयात अनन्य, अपूर्व आणि एकमेवाद्वितीय अशीच ठरली आहे.

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी स्वत: येऊन त्याची पहाणी करून गौरविलेल्या ‘पासोडी’ च्या जतनासाठी उभारण्यात येणाऱ्या या भवनाचं भूमीपूजन परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकतंच रविवारी झालं. या दालनामुळे हा अनमोल ठेवा अनेक वर्ष सुरक्षित राहील, असं मत धर्माधिकारी यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा