पुणे, 11 जानेवारी 2022: अत्यंत कठीण परिस्थितीतही खडकासारखं उभं राहणं आणि खंबीरपणे सामोरं जाणं हे भारतीय लष्कराचं सर्वात मोठं उदाहरण आहे. याचं वैशिष्ट्य लष्करानेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून आलं. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान थंडीत बर्फाच्या वादळात आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे.
भारतीय लष्कराचा हा जवान बर्फात उभा राहून देशाच्या सीमेवर लक्ष ठेवताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये (भारतीय सैन्याचा व्हायरल व्हिडिओ) बर्फाच्या वादळात एक शूर भारतीय सैनिक हातात रायफल घेऊन कसा उभा आहे, हे दिसत आहे. वादळ इतकं जोरात आहे की सैनिकाच्या गुडघ्यापर्यंत बर्फ साचला आहे. परंतु बर्फाचं वादळ देखील त्याला कर्तव्याच्या मार्गापासून परावृत्त करू शकलं नाहीत.
10 लाख लोकांनी पाहिला हा व्हिडिओ
हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकारी (पीआरओ उधमपूर, संरक्षण मंत्रालय), उधमपूर यांनी शेअर केलाय. ज्याला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडिओला 50,000 हून अधिक लाईक्स, 11,000 हून अधिक रिट्विट्स आणि हजारो टिप्पण्या मिळाल्या आहेत.
लोकांचं हे प्रेम पाहून @proudhampur यांनी 9 जानेवारीला लिहिलं- ‘तो (सैनिक) सावध राहतो कारण तो समोरच्याचा (शत्रूचा) तिरस्कार करतो म्हणून नाही, तर तो त्याच्या मागं असलेल्यांवर (देशवासी) प्रेम करतो म्हणून. एक दशलक्ष दृश्यांसाठी सर्वांचे आभार. प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद.’
केंद्रीय मंत्र्यांनी केली प्रशंसा
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतीय जवानाचा हा व्हिडिओ रिट्विट करताना लिहिलं – ‘मी भारतीय लष्कराचा नेहमीच ऋणी राहीन.’ हजारो यूजर्सनी लष्कराचं कौतुक केलंय.
जवानाच्या गुडघ्यापर्यंत बर्फ कसा गोठला आहे, तरीही तो छातीशी बंदूक धरून सीमेवर सज्ज उभा आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवानाचा हा व्हिडिओ ज्यानं कोणी पाहिला तो भारतीय लष्कराला सलाम केल्याशिवाय राहू शकला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे