पुणे, २८ ऑक्टोबर : खवय्यांना मिसळीचे अनेक प्रकार ज्ञात असतात. कोल्हापुरी, खानदेशी, नाशिक ची, चिंचवड, कल्याण अशा कितीतरी स्वादानुसार व्हरायटीज मिसळ आपण खाल्ल्या आहेत. पुण्यात अशीच अगदी वेगळी, नाविन्यपूर्ण ‘हिरवी मिसळ’ तिच्या वेगळ्या स्वादामुळे वर्षानुवर्षे खवय्यांना आकर्षित करत आली आहे. शंभरहुन अधिक वर्षांपासून पुण्यातील फडके हौद येथील वैद्य उपहारगृहाची झणझणीत ‘हिरवी मिसळ’ मिसळ आजपर्यंत चविष्ट मिसळचा मान पटकावून आहे. ११० वर्षांपूर्वी रघुनाथ वैद्य यांनी वैद्य उपहारगृहाची सुरुवात केली हाेती. तेव्हापासून आजपर्यंत वैद्य उपहारगृहाने मिसळची चव राखून ठेवली आहे.
पूर्वीच्या काळी पुण्यामध्ये फार कमी ठिकाणी मिसळ मिळायची. त्या सुरुवातीच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मिसळ पैकी, वैद्य उपहारगृह एक आहे. इतर ठिकाणी मिळणाऱ्या मिसळपेक्षा या ठिकाणची मिसळ वेगळी असल्याने इथे मोठी गर्दी असते. पुण्यात आल्यानंतर मिसळ खाल्ली नाही असं कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीने फार मोठी गोष्ट मिस केली आहे. कारण पुण्यात प्रत्येक कोपऱ्यावर मिसळ मिळते आणि तीही वेगवेगळ्या चवीची. पण तरीही चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी काही ठिकाणं मात्र अधिक जवळची आहेत.त्यातीलच एक म्हणजे वैद्य उपहारगृह.
आपल्या फेमस नाविन्यपूर्ण मिसळीविषयी वैद्य उपहारगृहाचे मालक दीपक जोशी सांगतात कि, मिसळ म्हणजे विविध पदार्थांची सरमिसळ. आधीची मिसळ म्हणजे मटकीची भाजी, पोहे, बटाटा आणि त्यामध्ये भजी, वडा तळल्यावरती राहिलेला चुरा टाकून पुरी सोबत खाणे.आम्ही काळानुसार मिसळीमध्ये काही बदल करत गेलो आणि वेगळ्या पद्धतीची मिसळ तयार केली. यामध्ये पहिल्यांदा कांदेपोहे, बटाटे, मटकीची उसळ आणि शेव आणि पातळ पोह्याचा चिवडा हे आम्ही मिसळमध्ये घालण्यास सुरुवात केली. तसेच ही मिसळ आलं, मिरची, लसूण पेस्ट व चिंच वापरून बनते. या मिसळला लाल तिखट टाकायची गरज लागत नाही. यामुळे मिसळचा रंग आपल्याला हिरवा असा दिसतो. तसेच ही मिसळ सुरू झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षानंतर आम्ही मिसळमध्ये हिरवे कच्चे टोमॅटो वापरायला सुरुवात केली. त्यापूर्वी पुण्यामध्ये टोमॅटो खाद्यपदार्थांमध्ये वापरले जात नव्हते. यामुळे आमच्या मिसळला एक वेगळा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा जाणवतो.
वैद्यांकडे चाळीस पन्नास वर्षांपासून रेग्युलर येणारे खवय्ये ग्राहक आहेत. या ठिकाणची मिसळ इतर मिसळ पेक्षा एक वेगळी मिसळ आहे. या ठिकाणच्या मिसळची चव चांगली असते, असं अनेक खवय्ये आवर्जून सांगतात. वैद्य उपाहारगृह हे बागडे रोड, बुधवार पेठ, पुणे येथे असुन ते सकाळी सात ते सकाळी साडेअकरा तसेच दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू असते. ८० रुपयाला एक प्लेट अशी इथली मिसळ मिळते आणि इतरही पदार्थ यासोबत मिळतात. हि स्पेशल ‘हिरवी मिसळ’ खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून भेट द्यावी असे हे मस्त ठिकाण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे