मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे क्षेत्र माहुली येथे दहन, मराठा आरक्षणावरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण केल्याचा आंदोलकांचा आरोप

सातारा २० नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षण या विषयावरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करत, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील क्षेत्र माहुली येथे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी युवक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय हा गंभीर बनला आहे, असे असताना देखील राज्याचे जबाबदार मंत्री छगन भुजबळ हे भाषणांमधून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत मराठा युवक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे महामार्गावर दहन केले. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले आहे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. मात्र हे बघवत नसल्याने केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजाचा वापर करत मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये राजकीय दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या युवक कार्यकर्त्यांनी केला.

न्युज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा